टीम लोकमन मरवडे |
मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आणि मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मरवडे गावविकास आघाडीच्या सौ. अंजली हरिदास चौधरी यांची आज निवड करण्यात आली.
मरवडे ग्रामपंचायतसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी व सहकाऱ्यांच्या नेतृत्वातील गावविकास आघाडी व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांचे बंधू संजय पवार यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत झाली होती.
मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या निवडणुकीमध्ये 13 पैकी मरवडे गाव विकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळाला तर सत्ताधारी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत 8 जागा जिंकत मरवडे गावविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आणि ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन केली.
मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पुनम मासाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी अंजना हरिदास चौधरी, सचिन शिवाजी घुले व आनंदीबाई वासुदेव पोतदार या तिघांनी अर्ज दाखल केले होते.
या तिघांपैकी सचिन शिवाजी घुले यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. त्यामुळे अंजना हरिदास चौधरी व आनंदीबाई वासुदेव पोतदार या दोघींमध्ये सरपंच पदासाठी लढत झाली. 13 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी अंजना हरिदास चौधरी यांच्या बाजूने मतदान केले तर 5 सदस्यांनी आनंदीबाई वासुदेव पोतदार यांना मतदान केले. अंजना हरिदास चौधरी यांना 8 मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंजना हरिदास चौधरी यांना विजयी घोषित केले.
या सरपंच पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मरवडे गावविकास आघाडीच्या अंजना हरिदास चौधरी विजयी होऊन मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. चौधरी यांच्या निवडीनंतर मरवडे गावविकास आघाडीच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत चौधरी यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. आज मरवडे गावविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
आज मरवडे ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीसाठी झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रतिभा घुगे यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून मरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका राखी जाधव यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग मोरे, उमेश लवटे, नवनाथ बनसोडे, संजय गायकवाड, नंदकुमार जाधव यांनीही या प्रक्रियेसाठी सहकार्य केले.











