टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या या भूमीला हरित वृक्ष भूमी म्हणून नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन व शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा अंगीकृत ‘वृक्षारोपण : जीवन संगोपन’ हा कार्यक्रम 21 जूनपासून हाती घेणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या संकल्पक व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी दिली. त्या गुरुवारी मंगळवेढा पंचायत समितीच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाडिक म्हणाल्या, यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प प्रशासन व मंगळवेढ्यातील विविध संस्थांच्या सहकार्यातून करण्याचे नियोजन करत आहोत. शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमार्फत यंत्रणा आणि साधारणपणे १०,००० रोपांचे नियोजन करण्यात येणार आहे. वृक्षारोपण जीवन संगोपन या कार्यक्रमांतर्गत तीन घटकांचा समावेश यामध्ये असेल त्यात चिलारमुक्त, निसर्गयुक्त मंगळवेढा तसेच वृक्षबँक (सीड बॉल) व ऑक्सिजन पार्क यांचा समावेश असणार आहे.
वृक्षारोपण कार्यक्रम १९ ते २१ जून आणि या उपक्रमाचा समारोप २१ जून रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधून कृष्णतलाव मंगळवेढा या ठिकाणी सकाळी दहा वाजता करण्याचे प्रयोजन आहे. चिलारमुक्त निसर्गयुक्त मंगळवेढा या संकल्पनेमध्ये ज्या शासकीय व खाजगी जागा आहेत त्या ठिकाणी अनुत्पादक व निसर्गाला उपयुक्त नसलेला चिलार काढून त्या ठिकाणी करंजीची झाडे लावण्याची ही संकल्पना आहे तर विद्यार्थ्यांकडून वृक्ष बँक (सीड बॉल) निर्मिती केली जाईल. याचे उद्घाटन इंग्लिश स्कूल प्रशालेत २० जून रोजी करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा हा या संकल्पनेचा उद्देश आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या पंढरपुरातील वारकऱ्यांना हे तयार केलेले सीडबॉल वाटप करण्यात येणार आहेत. याशिवाय ऑक्सिजन पार्क ही संकल्पना सुद्धा राबविण्यात येणार आहे. ज्यात कोविड महामारीच्या परिणामानंतर जगभरातील लोकांना नैसर्गिक ऑक्सिजन पार्कची गरज जाणवू लागली. जे या प्रदेशातील लोकांसाठी ऑक्सिजनची गरज पूर्ण करू शकतात. ऑक्सिजन उत्सर्जन पातळी वाढविण्यासाठी अनेक झाडे लावलेले हे घनदाट वनक्षेत्र केले जाईल.
२१ जून रोजी जागतिक योगदिन व वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करताना थोडे नाविन्यपूर्ण स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, यामध्ये वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त महिलांना हिरव्या रंगाची साडी व जागतिक योग दिनानिमित्त पुरुषांना पांढऱ्या रंगाचे कपडे अशी वेशभूषा देण्यात येणार आहे. वडाचे पूजन करत संवर्धन आणि संगोपन केले तर भविष्यासाठी निसर्ग समतोलही साधता येईल. जास्तीत जास्त महिलांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, चिंच, बांबू याप्रकारची रोपे मंगळवेढा आणि आसपासच्या खेडेगावात लावण्याचा मानस आहे.
वृक्षारोपण सहसा यशस्वी का होत नाही? या बाबींचा विचार केला असता चुकीची झाडे निवड, अयोग्य ठिकाण, लागवडाची खराब पध्दती व स्थानिक लोकांच्या सहभागाचा अभाव या गोष्टी निदर्शनास येतात. म्हणून वडाचे झाड जे हवा शुद्धीकरण, वायू प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत करते. पिंपळ ही औषधी असून दीर्घायुष्य असलेले झाड आहे. करंज ही वनस्पती जोमाने वाढणारी सावलीच्या हेतूंसाठी औषधी उपयोगासह तेलाचे मोठे उत्पादन होते. चिंच ही उत्पादन देते. कडुलिंब जी उष्ण हवामानात कमी पाण्यात टिकणारी, निसर्ग हवा शुद्ध करण्याचे कार्य करते शिवाय अनेक औषधी गुणधर्म सुद्धा यामध्ये आहेत. याबरोबरच बांबू कंपाऊंड उद्देशांसाठी वापरले जाते. तसेच कोनोकार्पस ही मोठ्या प्रमाणावर वाढणारी वनस्पती आणि स्व-कुंपण गुणवत्ता असणारी आहे. अशी माहिती डॉ. प्रियदर्शनी महाडिक यांनी यावेळी दिली.

वृक्षारोपणात लोकसहभाग महत्त्वाचा…
वृक्षारोपणाचे प्रयत्न लोकांच्या सक्रिय सहभागावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. लोकसहभागाशिवाय, वृक्षारोपणाच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण परिणाम साध्य करणे आव्हानात्मक आहे.म्हणून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांने पर्यावरणीय जबाबदारी म्हणून एक वृक्ष लागवड करावी.
यांच्याशी संपर्क साधावा…
वृक्षारोपण संबंधी सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, वृक्षप्रेमी नागरिक व या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी धनंजय लवटे सर हे कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्याशी 9767179294 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.










