टीम लोकमन मरवडे |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडी तालुका मंगळवेढा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अजित गायकवाड तर उपाध्यक्षपदी चेतन रामचंद्र गवळी व माधुरी प्रदीप गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती मरवडे केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडी ता. मंगळवेढा या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना आज करण्यात आली. त्यामध्ये सन 2025-26 व 2026-27 या दोन वर्षासाठी पुरुष व महिला प्रतिनिधी मधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. 13 सदस्यांच्या या व्यवस्थापन समितीमध्ये 6 महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भालेवाडी गावाने सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात आपला दबदबा निर्माण केल्याने दुर्लक्षित असलेले भालेवाडी गाव आता राज्याच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. भालेवाडीला नुकतीच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते संदीप पाठक व महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब यांनी भेट देऊन गावातील विकास कामांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे भालेवाडीतील शाळा व्यवस्थापन समितीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
भालेवाडीचे तरुण तडफदार व उच्च विद्याविभूषित सरपंच डॉ. श्रीकांत दवले सरपंच झाल्यापासून गावाच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. भालेवाडी गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व संपूर्ण राज्यात गावाला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी हा तरुण निस्वार्थपणे अखंडित कार्यमग्न असल्याचे दिसत आहे. गावाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी हा तरुण सरपंच आपल्या कार्याशी आणि कर्तव्याशी बांधिलकी जपत तन मन आणि धनाने काम करत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडीच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अजित अरुण गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी चेतन रामचंद्र गवळी व माधुरी प्रदीप गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून नितीन ज्ञानेश्वर पाटील, अमोल भागवत गवळी, अनिल मधुकर कोकरे, महादेव दगडू घाडगे, चैतन्य बाळासाहेब पाटील, मोनिका प्रवीण जाधव, मनीषा कुमार वाघमारे, पुनम सर्जेराव वाघमारे, सोनाली प्रशांत गवळी, माधुरी रामचंद्र वनखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भालेवाडीचे सरपंच डॉ. श्रीकांत दवले, मरवडे केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब सूर्यवंशी, मरवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाप्पा कोळी, भालेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी कळकुंबे, शाळेतील शिक्षिका मथुरा कोळी, सुनीता पवार, उषा जामगुंड, पल्लवी कांबळे यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महादेव घाडगे, ईश्वर आठवले उपस्थित होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार सरपंच डॉक्टर श्रीकांत दवले व केंद्रप्रमुख रावसाहेब सूर्यवंशी यांचेहस्ते करण्यात आला.









