टीम लोकमन मंगळवेढा |
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत असून आवताडे समर्थकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या नवख्या आमदाराला तालिका अध्यक्ष पदाची संधी देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आमदार समाधान आवताडे यांचा सन्मान केला आहे. आवताडे यांचेसोबतच पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा देखील हा सन्मान आहे. आमदार समाधान आवताडे यांचेवर भारतीय जनता पार्टीने दाखवलेल्या विश्वासामुळे आवताडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले असून कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून आमदारांची निवड केली आहे. यामध्ये आमदार समाधान आवताडे यांचा समावेश आहे. या पाच आमदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार तर काँग्रेसच्या एका आमदारचा समावेश आहे.
भारतीय जनता पार्टीकडून कालिदास कोळंबकर आणि समाधान आवताडे, शिवसेनेकडून संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमीन पटेल या पाच आमदारांना तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
आमदार आवताडे भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. यापूर्वीच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भारतनाना भालके यांना देखील तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर याच मतदारसंघातील आमदार समाधान आवताडे यांना ही संधी मिळाली आहे.











