मंगळवेढा : अभिजीत बने
नेत्रदान हे श्रेष्ठदान हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी व समाजामध्ये नेत्रदानाप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने निमा संघटनेच्या मंगळवेढा शाखेच्या सर्व सदस्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केल्याने त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र नेत्रदानाचा संकल्प पहिल्यांदाच केला गेला आहे.
लोकांना उपदेश देऊन फक्त नेत्रदानाचे महत्त्व समजावून न सांगता पहिले स्वतः अमलात आणून निमा मंगळवेढा शाखेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे नेत्रदानाला नक्कीच चालना मिळेल आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होईल. निमा संघटनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्रदानाचा संकल्प करून कृतीतून सामाजिक संदेश देण्याचा हा मंगळवेढा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असावा. यासाठी निमाच्या मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. अतुल निकम, सचिव डॉ. सुभाष देशमुख, निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. प्रीती शिर्के यांनी पुढाकार घेतला.
आपल्या देशात १ कोटीहून अधिक लोक नेत्रहिन आहेत. देशातील १ कोटी लोक अंध आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे कॉर्नियल अंधत्व. कॉर्निया हा डोळ्याचा सर्वात पुढचा थर आहे. ते पारदर्शक असते, त्यातील दोषामुळे दृष्टी जाते किंवा काही लोकांची पूर्णतः कमी होते. पण ते एका साध्या शस्त्रक्रियेने दुरुस्त होऊ शकते. कॉर्नियल ट्रान्सप्लांट असे या शस्त्रक्रियेचे नाव आहे. हा नवा कॉर्निया किंवा बोलायचे झाल्यास हे नवे डोळे कुठून येतात तर ते डोळे दान करणाऱ्या लोकांकडून येतात. डोळे दान करणे म्हणजे डोळे काढून दुसऱ्याला देणे असे नाही. नेत्रदान हे माणसाच्या मृत्यूनंतरच होते. हे लोक त्यांच्या आयुष्यात संमती देतात त्यामुळे मृत्यूनंतर इतर लोकांना त्यांच्या डोळ्यातून जग पाहता येऊ शकते.

भारतात नेत्रदान करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे नेत्रदानाबाबत पसरलेले गैरसमज. याबाबत चुकीचा समज असा आहे की, डोळे दान करणे म्हणजे संपूर्ण डोळा काढून टाकला जातो. परंतु हा पूर्णतः गैरसमज आहे. १३ ऑगस्ट रोजी अवयवदान दिवस साजरा केला जातो. किडनी, यकृत, हृदय, डोळे यांसारख्या अवयवांच्या दानाबद्दल माहिती पसरावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. ज्यांना नेत्रदान करायचे आहे ते दाते कोणत्याही नोंदणीकृत नेत्रपेढी किंवा नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधू शकतात.
१ वर्षावरील प्रत्येक व्यक्ती नेत्रदान (कॉर्निया) करू शकते, नेत्रदानासाठी वयाची मर्यादा नाही, वयाचे कोणतेही बंधन नाही. नेत्रदान करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. ज्यांनी आधीच आपले डोळे दान केले आहेत, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्य कोणत्याही नेत्रपेढी किंवा नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधू शकतात. कॉर्निया पुढील ६-८ तासांत काढला जाऊ शकतो. या प्रक्रियेत संपूर्ण डोळा काढला जात नाही. डोळ्यांसमोर कॉर्निया नावाचा पारदर्शक थर असतो. फक्त त्याला बाहेर काढले जाते. हे केल्यावर डोळ्यांना कोणत्याही प्रकारची जखम होत नाही.
नवीन रुग्णांना नवीन डोळे असे मिळतात, प्रथम मृत व्यक्तीचा कॉर्निया बाहेर काढला जातो. त्यानंतर ज्या नवीन रुग्णाचा कॉर्निया खराब झाला आहे, तो काढून टाकला जातो. त्यानंतर नवीन कॉर्नियाचे प्रत्यारोपण केले जाते. त्या शस्त्रक्रियेला कॉर्नियल प्रत्यारोपण म्हणतात. ही अतिशय सोपी शस्त्रक्रिया आहे. यामध्ये टाके टाकून नवीन कॉर्निया डोळ्यात टाकला जातो.
नेत्रदान करण्याबाबत लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. मृत्यूनंतर संपूर्ण डोळा काढून टाकला जातो. पण असे होत नाही. डोळ्याचा फक्त समोरचा भाग जो पारदर्शक असतो आणि ज्याला कॉर्निया म्हणतात. फक्त हे काढले जाते. हे कॉर्निया नवीन रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले जाते. जे पाहू शकत नाहीत. तुम्ही तुमचे दोन्ही डोळे दान केल्यास २ रुग्णांचे आयुष्य सुधारते. ज्या रुग्णांना कॉर्नियल अंधत्व आहे अशा रुग्णांवर ही डोळ्याची शस्त्रक्रिया केली जाते. कॉर्नियल प्रत्यारोपण ही अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया आहे. याचा अनेक रुग्णांना फायदा होतो. १ वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. त्यांची वैद्यकीय स्थिती काहीही असो. मधुमेह, रक्तदाब किंवा कोणताही आजार असला तरी नेत्रदान करता येते.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संघटनेचा ७७ वा स्थापना दिवस निमा मंगळवेढा शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निमाच्या मंगळवेढा तालुक्यातील सदस्यांनी हा नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी निमाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सतीश गोखले, निमा मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. अतुल निकम, निमा वुमन्स फोरम मंगळवेढा च्या अध्यक्षा डॉ. प्रीती शिर्के यांचेसह निमा मंगळवेढा शाखेचे सदस्य डॉ. रामानुज मर्दा, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. सिद्राम बुरकुल, डॉ. काशिनाथ वाले, डॉ. दत्तात्रय क्षीरसागर, डॉ. संतोष मेटकरी, डॉ. नितीन आसबे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ, अभिजीत हजारे, डॉ. समाधान टकले, डॉ. महेश माळी, डॉ. प्रशांत नकाते, डॉ. कैलास नरळे, डॉ. राहुल लवटे, डॉ. गिरीश मासाळ उपस्थित होते.








