टीम लोकमन पंढरपूर |
सिंहगड महाविद्यालयात “यशस्वी होण्यासाठी” या विषयावर सोमनाथ गायकवाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रमुख वक्ते सोमनाथ गायकवाड, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, डॉ. अतुल आराध्ये, रवींद्र ओहोळ यांचेहस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पंढरपूर पोस्ट ऑफिसचे हेड पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या जगण्याचे प्रयोजन ओळखून आपल्या कार्याचे नियोजन केल्यास ध्येयप्राप्ती सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत चर्चा करून उपलब्ध संधींचा फायदा करून घेतल्यास ध्येयप्राप्ती करता येते. यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व एककेंद्री लक्ष असल्यास आयुष्यात यशस्वी होता येते असे प्रतिपादन सोमनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले.