टीम लोकमन मंगळवेढा |
स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या मंगळवेढा महोत्सवांमध्ये मंगळवारी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या यशवंत मैदानावर प्रशालेतील स्थानिक विद्यार्थी कलावंतांनी आपल्या नृत्याविष्काराद्वारे बालरंगभूमी मंगळवेढा शाखेने उपस्थितांची मने जिंकली.
बालरंगभूमी परिषदेच्या राज्यप्रमुख अभिनेत्री नीलिमा शिर्के- सामंत यांच्या हस्ते बालकलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय नाट्य परिषद मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष कदम, शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. डॉ. मीनाक्षी कदम, भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर्स सेलचे जिल्हा संघटक डॉ. शरद शिर्के, निमा संघटना महिला फोरमच्या अध्यक्षा डॉ. प्रीती शिर्के, यतीराज वाकळे, प्राचार्य रवींद्र काशीद, कल्याण भोसले, जयराम आलदर, अजित शिंदे, सुभाष बाबर, रमेश पवार आदी उपस्थित होते.
उद्घाटनाप्रसंगी बोलताना नीलिमा शिर्के- सामंत यांनी मंगळवेढा शाखेच्या कामाचे कौतुक करत ग्रामीण भागातील बालकलाकार हे नैसर्गिक कलेचे उपासक असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद सहकार्य करेल अशी ग्वाही दिली व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मुंबईच्या सदस्या तेजस्विनी कदम यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले.
यावेळी नरखेड शाखेच्या विद्यार्थिनीने मंगळागौर गाण्याचे अतिशय बहारदार सादरीकरण केले. आंबेचिंचोली शाखेच्या विद्यार्थिनींनी देवा श्री गणेशाद्वारे गणेश आराधना सादर केली. मंगळवेढा शाखेच्या बालकलाकारांनी ढोल ताशा झांज पथकाचे सादरीकरण केले. वेळापूर शाखेकडून लेझीम कला सादर करण्यात आली. बेगमपूर शाखेकडून गोंधळ गीताचे सादरीकरण करण्यात आले. भोसे शाखेने झांज पथक कला प्रकार सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर विठ्ठल फुगारे यांनी आभार मानले.











