टीम लोकमन सांगली |
देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशातच आता एक अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना आज मंगळवार सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील ॲड. वंदना संतोष गायकवाड (वय 38) आणि त्यांचे पती संतोष धोंडीराम गायकवाड (वय 45, राहणार जयभवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य त्यांच्या MH-09-FJ-2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे तुळजापूर व अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात होते. शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक MH-09-CJ-2671 व त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक व कामगार चहा पिण्यासाठी जवळच असलेल्या हॉटेलमध्ये थांबले होते. धडक एवढी भीषण होती की, कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे स्विय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले. अमोल कोरे यांनी तात्काळ संपर्क साधल्याने पोलिसांना मोठी मदत मिळाली.







