टीम लोकमन भुसावळ |
भुसावळ तालुक्यातील खडका येथील तरुणाला प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून खांबाला बांधून निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दिनांक 20) दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण व तरुणी यांनी 18 मार्चला घरातून पळून जाऊन पंचवटी (नाशिक) येथे विवाह केला होता. त्यानंतर 19 मार्च रोजी दोघांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली होती. दोघांचा जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले होते.
शुक्रवारी दुपारी संबंधित तरूणीचे नातेवाईक मनोज पाटील व रुपाली पाटील यांनी 10 ते 15 जणांसह भुसावळातील सुहास हॉटेलजवळील दूध डेअरी परिसरात संबंधित तरुणाला पकडले आणि त्यानंतर त्याला खांबाला बांधत निर्वस्त्र करत लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर संशयितांनी तरुणाला दुचाकीवरून खडका बसस्थानकाजवळ पुन्हा मारहाण केली. त्यानंतर तरुणाला त्याच्या घरी सोडत तिथेही त्याच्या आईला बेदम मारहाण केली. तसेच घर जाळून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. या मारहाणीमध्ये तरुणाचा एक हात फॅक्चर झाला असून परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
तब्बल 12 जणांविरोधात दाखल झाला गुन्हा….
या प्रकरणी चेतन जंगले यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात मनोज पाटील, रूपाली पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील तसेच इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोमल प्रकाश पाटील (वय 24), विजय नरोटम पाटील (वय 52), हेरंब महेश चौधरी (वय 19), ज्ञानेश्वर भास्कर भोई (वय 19) आणि संजय सोनू बडे (वय 60) या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.






