टीम लोकमन नांदेड |
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात स्विफ्ट डिझायर कारची समोरुन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सशी समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. नांदेड संभाजीनगर राज्य महामार्गावरील गणेशपुर जवळ हा अपघात झाला आहे.
स्विफ्ट डिझायर क्रमांक MH12 GF 6259 व मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक MH20 DD 7666 ची दुचाकीला वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दोघाची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये स्विफ्ट डिझायर मधील सय्यद आबेद अली सय्यद महबूब अली (वय 38 वर्ष), सय्यद सुमय्या सय्यद आबेद अली (वय 35 वर्ष), व जुनेदा मरियम सय्यद आबेद आली (वय 9 वर्ष) (रा.बसमत) हे तिघेजण जागीच ठार झाले आहेत.
तर सय्यद इस्माईल महबूब अली, सय्यद फरवा सय्यद आबेद अली (वय 4 वर्ष), सय्यद उफद सय्यद आबेद अली (वय 7 वर्ष) हे जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्विफ्ट डिझायर मध्ये 6 जण एकाच घरातले होते. ते सर्वजण वसमत येथून आपल्या बहिणीकडे ईद निमित्त भेटायला जात होते. तर मिनी ट्रॅव्हल्स संभाजीनगरहून शेकमाक येथे रमजान ईदला भेटण्यासाठी जात होते.
या मिनी ट्रॅव्हल्स मध्ये 13 जण होते. यातील अशफाक कुरेशी (वय 60 वर्ष), अक्रम खान (वय 61 वर्ष), फैमुदा अक्रम खान (वय 55 वर्ष), मसीउल्ला बेग (वय 60 वर्ष), शाहिदा बेगम (वय 55 वर्ष), अबरार कुरेशी (वय 35 वर्षे) व समीउल्ला खान हे सर्व राहणार संभाजीनगर येथील असून या सर्व जखमींना उपचारासाठी जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
डिझायर मधील सय्यद इस्माईल महबूब हे ही या अपघातात जखमी झाले आहेत. ही घटना 22 मार्च रविवारी दुपारी दीड वाजता घडली या घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. झुंजुर्डे, बीट जामदार उद्धव माने, बीट जामदार हरी गायकवाड, गजानन झोरे आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक नेवल, बालासाहेब गिराम, भागवत घोडके, मनोहर हाके, सूर्यकांत हाके, महेश केदारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकामी मदत केली.






