टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील विलास सूर्यकांत पाटील यांनी केंद्रप्रमुख पदासाठी IBPS मार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या पदाचे जुने नाव केंद्रप्रमुख असे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार या पदाचे नाव समूह साधन केंद्र समन्वयक असे करण्यात आले आहे. नुकत्याच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत आयबीपीएस संस्थेकडून जाहीर झालेल्या निकालानुसार, या परीक्षेस एकूण 46068 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 38558 परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते. विलास पाटील यांनी 200 पैकी 156 गुण मिळवून जिल्ह्यामध्ये 24 वी रँक आणि राज्यामध्ये 392 वी रँक पटकावली आहे.
विलास पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी व माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे. पुणे DIET येथे डीएड चे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात नोकरीच्या सुरुवातीच्या काळात सेल टॅक्स इन्स्पेक्टर (STI) या पदाच्या परीक्षेत पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले होते. प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिक येथे दहा वर्षे सेवा करून आंतरजिल्हा बदलीने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगी येथे सध्या ते गणित विषयाचे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करत त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्यामार्फत बी.एस्सी. बी.एड. (B.Sc. B.Ed.) पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना 2024 मध्ये मंगळवेढा पंचायत समितीकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशामध्ये बंधू दीपक सूर्यकांत पाटील (Assistance General Manager, Bank of Maharashtra) यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब बिचुकले, तळसंगीचे सरपंच सौ. पूजा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता दुधाळ, पंचायत समिती सदस्या मोहिनी गणपाटील, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे, केंद्रप्रमुख निवृत्ती सूर्यवंशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळसंगीचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, केंद्रीय मुख्याध्यापक सिद्धप्पा कोळी, एकल अध्यक्ष मंच तालुका अध्यक्ष आप्पाराया न्यामगोंडे, जिल्हा सोसायटीचे संचालक तथा शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक मलगोंडे, राजेंद्र टिंगरे, भारत शिवशरण, विष्णू कुंभार, राधिका शिलेदार, सुनिता काकडे, संगीता कुलकर्णी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.








