टीम लोकमन पुणे |
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हुंडाबळी आणि सासरच्या जाचाच्या घटना थांबण्याचे नाव काही घेत नाहीत. पुण्यातील लोणीकंद परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आपला जीवनप्रवास संपवला आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच झालेल्या लग्नाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे लग्न आठ महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झाले होते. संसार सुखाचा होईल अशीच स्वप्ने वैष्णवी आणि तिच्या माहेरच्यांनी पाहिली होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. पती, सासू आणि सासऱ्याकडून शुल्लक कारणावरून वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. इतकेच नव्हे तर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता.
सासरच्या लोकांकडून होणारा सततचा अपमान आणि पैशांची मागणी यामुळे वैष्णवी कमालीची मानसिक तणावाखाली गेली होती. अखेर याच जाचाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. राहत्या घरात कोणी नसताना तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पती, सासू आणि सासऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी तिचे पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्या व छळाच्या विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेमुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडा प्रथेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







