टीम लोकमन |
लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे. अश्विनी चौगुले असे आरोपी महिलेचे नाव असून तिने नंदिनी नावाच्या आपल्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अश्विनी चौगुले हिला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तिला 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर अश्विनी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
कोणत्याही मानसिक आजारामुळे नव्हे तर केवळ रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मूळचे हासेगाव येथील रहिवाशी असलेले चौगुले कुटुंब रोजगाराच्या शोधात उदरनिर्वाहासाठी लातुरात आले होते. कुटुंबप्रमुख विक्रम चौगुले हे उसाच्या ट्रॅक्टरवर काम करून चरितार्थ चालवत होते.
आईने पोटच्या मुलीवर केले तब्बल 17 वेळा चाकूने वार
19 जानेवारी रोजी सकाळी घरात वाद झाला आणि त्याचे रूपांतर या अमानुष घटनेत झाले. अश्विनीने आपल्या दीड वर्षांच्या मुलीवर एक दोन वेळा नाहीतर तब्बल 17 वेळा चाकूने वार केले. इतकेच नव्हे तर तिने चिमुरडीच्या तोंडातही चाकू खुपसल्याचे समोर आले असून अवघ्या दीड वर्षांच्या त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अश्विनीचा चार वर्षांचा मुलगा राजवीर याने हे सगळे आपल्या डोळ्यांनी पाहिले. आईकडूनच लहान बहिणीची हत्या होताना पाहिल्याने त्या बालमनावर खोल जखम झाली आहे. विक्रम चौगुले घरी परतले तेव्हा घराचा उंबरठा रक्ताने माखलेला व मुलगी नंदिनी मृतास्थेत पडलेली दिसली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून या घटनेबद्दल समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी महिलेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.







