टीम लोकमन मंगळवेढा |
शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आश्रम शाळा व जुनिअर कॉलेज येड्राव तालुका मंगळवेढा प्रशालेचे माजी प्राचार्य विश्वंभर काळे यांचे सुपुत्र डॉ. विक्रम काळे यांच्या मंगळवेढा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचा आज शुभारंभ होणार असल्याची माहिती युवा उद्योजक विनोद काळे यांनी दिली.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे व शाहू परिवारातील सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.
डॉ. विक्रम काळे गेल्या 3 वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ते सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती व येड्राव येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. संतभूमी म्हणून सातासमुद्रा पलीकडे नावलौकिक असलेल्या व समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंगळवेढा नगरीचा वैद्यकीय वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी डॉ. विक्रम काळे हे मंगळवेढा शहरात वैद्यकीय सेवा सुरू करीत असून ते आजपासून रुग्णसेवेत कार्यरत होत आहेत.
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक येथे जुन्या राष्ट्रवादी भवन या इमारतीमध्ये डॉ. विक्रम काळे यांचे हॉस्पिटल आज कार्यरत होत आहे. या हॉस्पिटलमध्ये ईसीजी, एक्स-रे, ऑक्सिजन, उच्च रक्तदाब, मधुमेह, नेब्युलायझेशन, सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग, सुसज्ज अंतररुग्ण विभाग, महिला व पुरुष स्वतंत्र अंतररुग्ण विभाग, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅबोरेटरी व तज्ञ डॉक्टरांच्या भेटी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुरलीधर चौक मंगळवेढा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज येड्रावचे माजी प्राचार्य विश्वंभर काळे सर, युवा उद्योजक विनोद काळे, डॉ. विक्रम काळे व काळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.