टीम लोकमन सांगोला |
सांगोला तालुक्यातील चिंचोली रोडवरील ब्रम्हओढ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. सदरची घटना 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत नारायण गोडसे (वय 52, रा. चिंचोली रोड, बुरांडेवस्ती, सांगोला) आहे. ते मजुरीच्या कामासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.
सिद्धनाथ सुरेश दहीवडकर (वय 21, रा. पुजारवाडी, सांगोला) हा आपल्या ताब्यातील (होंडा क्रमांक MH 45 BC 1017) मोटारसायकल भरधाव वेगात व चुकीच्या दिशेने चालवत होता. त्याने गोडसे यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत गोडसे गंभीर जखमी झाले होते मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात अतुल सरगर (राहणार. धायटी), भाऊ विश्वंभर फाळके (राहणार. हलदहिवडी) हे गंभीर जखमी झाले असून आरोपी दहीवडकर हादेखील किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी मयूर चंद्रकांत गोडसे (वय 23, रा. चिंचोली रोड, बुरांडेवस्ती, सांगोला) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.