टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील वाहन चालकांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी मंगळवेढा पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी केले.
मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवेढा येथे चालक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपनिरीक्षक विजय पिसे बोलत होते. ते म्हणाले, चालक म्हणजे देशाचे दुसरे सैनिकच आहेत असे म्हणत वाहनचालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांच्या कामाचे कौतुक करत सहकार्याची भावना व्यक्त केली.
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवेढ्यात चालकदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना वाहतूक दिनाच्या शुभेच्छा पोलिसांनी दिल्या.
इतरवेळी वाहने अडवून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या व वाहनचालकांकडून दंड वसूल करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी वाहन चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केल्याने वाहनचालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. याप्रसंगी एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिसांनी वाहन चालकांप्रती व्यक्त केलेल्या कृतघ्नतेमुळे व कौतुकामुळे वाहन चालकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळाले. मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाचे इन्चार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी यादव यांनी या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी चालक दिन साजरा केला, वाहनचालकांचे कौतुक केले व वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे काही काळ का होईना पोलिसांबद्दल वाहन चालकांमध्ये आदरभाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवेढा वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे मंगळवेढा तालुक्यातील वाहन चालकांकडून कौतुक होत असून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या चालक दिनाच्या यशस्वीतेसाठी वाहतूक शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन काळेल त्यांनी विशेष परिश्रम घेतले.