टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या माळीनगर ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या आणि सत्ताधारी गटाला धक्का देणाऱ्या सरपंच सौ. अनुपमा अनिल एकतपुरे यांनी ‘अंतर्गत कामकाजातील आणि गावपुढाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून’ आपल्या सरपंच पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.सरपंच अनुपमा एकतपुरे यांनी आपला राजीनामा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला असून या अनपेक्षित निर्णयामुळे माळीनगरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकतपुरे यांची राजकीय पार्श्वभूमी आणि विजय…
सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलेसाठी राखीव होते. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी गटाचा पराभव करत मोहिते-पाटील गटाच्या सौ. अनुपमा एकतपुरे या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचा हा विजय तालुक्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला गेला होता. परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सरपंच अनुपमा एकतपुरे यांनी राजीनामा का दिला? याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच सरपंच एकतपुरे यांनी स्वतःच यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सांगितले की, “चुकीच्या कामांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर दबाव होता, ज्याला मी कधीच सहमती दर्शवली नाही. गावाच्या विकासकामांसाठी मला मोहिते-पाटील गटाचे पूर्ण सहकार्य आणि पाठबळ आहे. मात्र काही स्थानिक गावपुढाऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे कामकाज करणे असह्य झाले होते. याच कारणामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.
सरपंचांच्या राजीनाम्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याविषयी बोलताना माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी माहिती दिली. “माळीनगरच्या सरपंचांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. तो पुढील चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठवला जाईल. नियमांनुसार सदस्यांचा ठराव मागवून घेऊन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.”
पुढे काय? राजकीय भवितव्य अधांतरी
अनुपमा एकतपुरे यांच्या राजीनाम्यामुळे माळीनगरमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. या घटनेचे भविष्यात अनेक दूरगामी परिणाम दिसू शकतात. सरपंचपद रिक्त झाल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये आता नवीन सरपंचपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होऊ शकते. माळशिरस तालुक्यातील माळीनगर सारख्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच गमावणे हा मोहिते-पाटील गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
सरपंचांच्या राजीनाम्यास कारणीभूत ‘गावपुढारी’ कोण?
एकतपुरे यांनी उल्लेख केलेले ‘गावपुढारी’ नेमके कोण आहेत आणि त्यांचा नेमका काय स्वार्थ होता. याविषयी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गावातील विकास कामांवर या राजकीय अस्थिरतेचा काय परिणाम होणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. या राजीनामा नाट्यामुळे माळीनगरचे राजकारण एका नव्या वळणावर आले असून यामुळे पुढील काळात अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.