टीम लोकमन सांगोला |
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये विस्तार असलेली आणि शेतकरी, व्यापारी, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक व उद्योजक यांच्या आर्थिक गरजांसाठी सदैव तत्पर असलेली एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व सूर्योदय अर्बन, सूर्योदय फाउंडेशन यांच्यावतीने या परिवाराचे प्रमुख अनिलभाऊ इंगवले यांच्या संकल्पनेतून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन एका अनोख्या उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा असलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दुसरा महत्त्वाचा टप्पा असलेली इयत्ता बारावी. या दोन्ही परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या सर्व प्रशालेतील सर्वच शिक्षकांना देखील गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणारे, अर्थकारणातून आर्थिक दुर्बल घटकांचा आधारवड बनलेले, सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देणारे, दिलदार मनाचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून अल्पावधीतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व अनिलभाऊ इंगवले यांच्या कार्यकुशल नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून सूर्योदय उद्योग समूह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून वित्तीय क्षेत्रामध्ये या समूहाचे अतिशय उल्लेखनीय असे कार्य केले आहे. देशाच्या आर्थिक राजधानी पासून ते कर्नाटक राज्य आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एल के पी मल्टीस्टेटचा शाखा विस्तार बहरला आहे. या माध्यमातून अर्थकारणासोबतच सामाजिक बांधिलकी देखील जपली जाते.
बँकेच्या विविध शाखांच्या परिसरातील विद्यालयांची निवड करून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये संबंधित शाळांमधील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्या शाळांमधील शिक्षकांना स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी दोन राज्यातील 300 शाळांमधील 1800 विद्यार्थी आणि सुमारे 8500 शिक्षकांना सन्मानित करून तब्बल 1 लाख 17 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपणारा कदाचित हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा.
सूर्योदय परिवाराचे प्रमुख अनिलभाऊ इंगवले यांनी सन 2010 साली जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सूर्योदय उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन आणि सूर्योदय महिला अर्बन यासारख्या आर्थिक संस्थांसोबतच सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल व डॉ. बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदय दूध विभाग कार्यरत आहे.
या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संस्था, उद्योग आणि व्यवसायाची वाटचाल एका बाजूला सुरू असताना सांस्कृतिक फेस्टिवल, अनेकविध प्रकारची आरोग्य शिबिरे, दुष्काळ निवारण कार्यासाठी प्रयत्न, रक्तदान शिबिरे, अन्नदान सेवा आणि पर्यावरणाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवडीची विशेष मोहीम अशा अनेक उपक्रमांद्वारे व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी या उद्योग समूहाने जपलेली आहे.
यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे निमित्ताने सूर्योदय व एलकेपी परिवाराने घेतलेला व्यापक स्वरूपातील गुणीजनांच्या सन्मानाचा हा उपक्रम म्हणजे एक अनोखा विक्रमच असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. याबद्दल अनिलभाऊ इंगवले व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी एलकेपी मल्टीस्टेट आणि सूर्योदय अर्बन या संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.