टीम लोकमन सांगोला |
एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन व सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांना सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ‘सकाळ गौरवगाथा सन्मान 2025’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. राज्यसभेच्या खासदार संसदरत्न मेघाताई कुलकर्णी आणि पुण्याचे पोलीस सहआयुक्त मनोज पाटील यांच्या शुभहस्ते टीप टॉप इंटरनॅशनल वाकड पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका अत्यंत शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील ज्वलंत प्रश्न ध्यानात घेऊन जिथे जिथे पोकळी असेल तिथे संधी समजून उद्योगांचे साम्राज्य उभे करणारे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत विकासाला मोठा हातभार लावणाऱ्या राज्यातील काही असामान्य व्यक्तींच्या गौरवाची यशोगाथा समाविष्ट असलेली “कॉफी टेबल बुक” ही अत्यंत सन्मानाची गौरवगाथा सकाळ माध्यम समूहाने नुकतीच प्रकाशित केली आहे. यामध्ये सहकार, कृषी, उद्योग याबरोबरच विशेषतः आर्थिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन यासारख्या अनेक संस्थांचा आर्थिक डोलारा यशस्वीपणे सांभाळणारे अनिलभाऊ इंगवले यांच्या दैदीप्यमान कार्याची यशोगाथा या कॉफी टेबल बुक मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
सन 2010 साली अनिलभाऊ इंगवले यांनी डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी यासारख्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सूर्योदय उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी, कष्टकरी, पशुपालक तसेच छोटे-मोठे व्यवसायिक यांना आर्थिक हातभार लावण्याकरिता विविध प्रकारच्या वित्तीय संस्था उत्कृष्टपणे चालवत कृषी क्षेत्र, उद्योग, बांधकाम क्षेत्र, दुग्ध व्यवसाय याबरोबरच व्यापक स्वरूपात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य हीच सूर्योदयची जनमानसात ओळख असून सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल, सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिला आहे.
सूर्योदय उद्योग समूह आणि या समूहाचे अध्वर्यू अनिलभाऊ इंगवले यांना महाराष्ट्र उद्योजकता, महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड, उद्योगरत्न यासारखे विविध पुरस्कार आजपर्यंत मिळाले असून सकाळच्या या पुरस्कारामुळे सूर्योदयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. अनिलभाऊ इंगवले आपल्या कार्यामुळे अल्पावधीतच तरुणांचे आयडॉल बनले असून दिलदार मनाचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची संपूर्ण जिल्हाभर ओळख निर्माण झाली आहे. एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बनच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी व्यवसाय बुद्धीसाठी मदतीचा हात दिला असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक नवउद्योजकांनी त्यांच्या मदतीने विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय उभारले आहेत.
सूर्योदयच्या माध्यमातून सहकाऱ्यांना सोबत घेऊन आजवर केलेल्या कार्याची सकाळ माध्यम समूहाने दखल घेऊन माझा सन्मान केला. त्याबद्दल ऋण व्यक्त करत असून अशा पुरस्कारामुळे प्रेरित होऊन भविष्यात आमच्या कार्याची व्याप्ती सातत्याने वाढवत राहू. अशा भावना यावेळी बोलताना इंगवले यांनी व्यक्त केल्या. या पुरस्कारामुळे अनिलभाऊ इंगवले यांचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सहकार व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.