टीम लोकमन मंगळवेढा |
बारामती मधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखाण्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने बळीराजा सहकार पॅनल उभा केला होता. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते परंतु त्यांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे. शरद पवारांच्या होमटाऊनमध्ये शरद पवारांना बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवारांच्या पॅनलकडे विजयी आघाडी
बारामती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी निळकंठेश्वर पॅनल उभा केला होता. या पॅनलच्या 21 पैकी 12 उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळवला आहे. तर 7 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ‘ब वर्ग’ गटातून विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत किती पॅनल रिंगणात?
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. ज्याचा परिणाम मतदानावर पाहायला मिळत आहे. आतापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल अशी चार पॅनल निवडणूक रिंगणात होती. आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागल्या आहेत.