टीम लोकमन मंगळवेढा |
मे महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे आता मे आणि जून या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु हा हप्ता कधी येणार याबाबत अद्यापतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित वटपोर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहिणींना खूशखबर देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लाडक्या बहिणींना वटपोर्णिमेला खुशखबर मिळणार?
येत्या 10 जून रोजी वटपोर्णिमा आहे. वटपोर्णिमा हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. दर महिन्यात कोणत्याही सणाचा मूहूर्त साधतच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. त्यामुळे जून महिन्यात देखील वटपोर्णिमेच्या दिवशीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये येणार?
लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित 3000 रुपये एकत्र येऊ शकतात किंवा मे आणि जूनचा हप्ता वेगवेगळ्या दिवशीदेखील देखील दिला जाऊ शकतो. परंतु जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की असल्याचे सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार
लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहे. त्यातील काही महिला या सरकारी कर्मचारीदेखील आहेत. अडीच हजारांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेतून वगळण्यात येणार आहे.









