टीम लोकमन सोलापूर |
सोलापुर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात तुलनेने जास्त दाहकता जाणवत असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या घरात असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे प्रखर उन्हात रस्त्यावर वाहने पेटण्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यापासून शहर व परिसरात तीन वाहने जळाली आहेत.
सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर सोलापूर शहराजवळ देगाव हद्दीत एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या एका स्कार्पिओ मोटारीच्या इंजिनमधून अचानकपणे धूर निघून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. तेव्हा तात्काळ प्रसंगावधान राखून चालकाने मोटार लगेच पेट्रोल पंपापासून काही दूर अंतरावर नेऊन थांबविली मात्र तोपर्यंत मोटारीने पेट घेतला होता.
ही मोटार माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांची असून ते स्वतः मोटारीत असताना ही दुर्घटना घडली. परंतु त्यांनी अवघ्या काही सेकंदात प्रसंगावधान राखून मोटार पेट्रोल पंपाबाहेर नेऊन थांबविल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र सभोवताली आगीने लपेटल्यामुळे मोटार संपूर्ण जळून खाक झाली आहे.
दुसरी घटना सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाची प्रवासी बस दक्षिण सोलापूर तालुक्यात मुस्ती येथे निघालेल्या एका प्रवासी बसला दुपारच्या रणरणत्या उन्हात अचानकपणे आग लागली. सुरूवातीला इंजिनमधून धूर वाढला आणि आग लागल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. तेव्हा कोणताही विलंब न लावता त्याने बसवाहकासह सर्व प्रवाशांना आगीची माहिती दिली आणि सर्वांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण बसमधून खाली उतरले. नंतर संपूर्ण बसला आगीने लपेटले होते. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
शहरातील नवी पेठ सारख्या अति वर्दळीच्या बाजारपेठेत एक दुचाकी अचानकपणे लागलेल्या आगीत जळून खाक झाली. एक दुचाकीस्वार नवी पेठेत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने लक्षात आले. मात्र आगीत संपूर्ण दुचाकी जळाली आहे.







