टीम लोकमन मंगळवेढा |
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला आहे. कामगार दिनाच्या दिवशीच कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.
कांदा काढणीसाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात…
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघाला होता. मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाला. या पिकअपमध्ये साधारण 18 ते 20 महिला मजूर होत्या. टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झाला तर पंधरा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कामगार दिनाच्या दिवशी मजुरीसाठी निघालेल्या महिलांचा जीव गेल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. पलटी झालेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचे समोरील टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामासाठी मजूरीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला कामावर जात आहेत.








