टीम लोकमन सांगोला |
बैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील महूदजवळ ही दुर्घटना घडली आहे. सुरेश हरिअप्पा सरगर (वय 40, राहणार महूद तालुका सांगोला) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
महूद-महिम परिसरात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सहकार्याने बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीत सोलापूरसह जवळपासच्या इतर जिल्ह्यातील सुमारे 250 बैलगाडे उतरले होते. ठरल्याप्रमाणे बैलगाडा शर्यतीला उत्साहात सुरुवात झाली. हजारो प्रेक्षक शर्यत पाहण्यासाठी हजर होते. त्याच वेळी दोन बैलगाडे वेगाने धावत असताना अचानकपणे त्यातील एक बैलगाडा नियंत्रण सुटल्याने प्रेक्षकांच्या गर्दीत घुसला आणि एकच गोंधळ उडाला.
बैलगाड्याची सुरेश सरगर यास जोरदार धडक बसली. त्याच्या छातीला जोरात मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.









