टीम लोकमन मंगळवेढा |
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव यांचे अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्रामार्फत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अन्न सुरक्षा अधिकारी गणेश दत्तू आणि महसूल सहाय्यक अधिकारी सम्राट घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुरुवातीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. औदुंबर जाधव, उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक अन्नसुरक्षा अधिकारी गणेश दत्तू, महसूल सहाय्यक अधिकारी सम्राट घुले तसेच स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. सुधाकर राठोड यांचेहस्ते अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर होनराव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचे समन्वयक प्रा. डॉ. संजय शिवशरण, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ जगताप, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड, सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेश गावकरे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक अन्न सुरक्षा अधिकारी गणेश दत्तू म्हणाले, मंगळवेढा पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंद शहा यांनी महाविद्यालय सुरू करून खूप मोठे योगदान दिले आहे. आम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली त्यावेळेस असे व्यासपीठ आम्हाला लवकर मिळाले नव्हते. तुम्हाला ते अगदी योग्य वेळेत हे मिळालेले आहे. याचा फायदा तुम्ही घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. म्हणजे पुढील संघर्ष कमी होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान असा भेदभाव नसतो. सध्या स्पर्धा परीक्षेचे अनेक ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. त्यामुळे मी ग्रामीण भागातील आहे म्हणून मला अडचण आहे असे कोणी म्हणण्याचे कांहीही कारण नाही. सध्या स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन क्लासेस सर्वत्र उपलब्ध आहेत. या ऑनलाइन क्लासेसचाही उपयोग आपल्या तयारीसाठी नक्कीच होतो. आयुष्यात वेळेचा सदैव सदुपयोग करण्यास शिका. ही वेळ पुन्हा आयुष्यात कधीच परत येत नाही याचे भान ठेवा. आई-वडिलांचे कष्ट लक्षात घ्या. ह्यापेक्षा दुसरी कोणतीही प्रेरणा घेण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.
यावेळी दुसरे मार्गदर्शक महसूल सहाय्यक अधिकारी सम्राट घुले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्याअगोदर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्यावा. त्याप्रमाणे त्याचे नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करावी. स्पर्धा परीक्षेबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्याच्याकडे लक्ष न देता एकाग्रतेने अभ्यास करा. मुलींनाही या स्पर्धा परीक्षेमध्ये मोठी संधी आहे. याचा विचार करून त्यांनीही स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे. स्पर्धा परीक्षेसाठी मोठी स्पर्धा असली तरी वेळेचे योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव म्हणाले, आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी जे मार्गदर्शक आपणास लाभले आहेत ते दोन्हीही मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ह्या हेतूनेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी खूप गुणी आहेत. कर्तबगार आहेत. आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी उत्कर्ष संजय क्षीरसागर हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचा ब्रँड अँबेसिडर आहे तर कु. प्रियांका क्षीरसागर हिने नुकतीच अलंकार पदवी प्राप्त केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविलेले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव सर्वदूरपर्यंत पोहोचवले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील ही वेळ अत्यंत महत्त्वाची अशी आहे. या वेळेचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा आदर्श समोर ठेवून स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल. आज पर्यंत कुटुंबाच्या नावाने तुमची ओळख होती तर पुढील काळात स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून तुमच्या नावाने कुटुंबाची ओळख होईल अशी कर्तबदारी दाखवा . आम्हाला तुमचा सन्मान करण्याची संधी द्या. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी उत्कर्ष संजय क्षीरसागर तसेच प्रियांका क्षीरसागर या गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागतगीत बी. ए. भाग 3 मराठी विभागामध्ये शिक्षण घेत असलेली कु. प्रियांका क्षीरसागर हिने गायले. प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. सुधाकर राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेश घाडगे यांनी तर आभार प्रा. धैर्यशील भंडारे यांनी मानले.










