टीम लोकमन जळगाव |
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटने संदर्भात महाराष्ट्रातील नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐऱणीवर आला आहे. असे असताना आता जळगामधील मुक्ताताईनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय? असा सवाल विचारला जात आहे.
जळगावामधील मुक्ताताईनगरमध्ये यात्रेसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि त्यांची मुलगी आल्या होत्या. या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार समजताच मंत्री रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत महिलांसह थेट अहिल्यानगर पोलीस ठाणे गाठले. यामुळे पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव गोळा झाला होता. आता या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
यावेळी आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय? असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांना विचारला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली असून केंद्रीय मंत्र्याच्या मुली सोबत झालेल्या प्रकारामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदार व केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षा खडसेंच्या मुलीचीच टवाळखोरांनी छेड काढल्याने राज्यातील भाजपचे कुटुंब प्रमुख असलेले राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









