टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक 11 ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी दिली.
मंगळवार दि 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भगवी पदयात्रा, सायंकाळी 6 वाजता शिवमंचाचे पूजन, सायंकाळी 7 वाजता शिवमुर्तीची प्रतिष्ठापना तर 7.30 वाजता शिवम योगा क्लासच्या विद्यार्थ्यांकडून योगसाधनेतून शिववंदन करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता संदीप मोहिते व आण्णा चव्हाण तिप्पेहळी ता. सांगोला यांचे जुगलबंदी भारूड होणार आहे.
गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी 7 वाजता शिवरायांना का आठवावे ? या विषयावर निलेश चव्हाण संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी 7 वाजता युवाशाहीर अविष्कार देशिंग, कवठेमहाकांळ जि सांगली यांचा स्फूतीगीते व पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी 7 वाजता मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत अकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर तसेच वेशभूषा स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य हभप पंकजपाल महाराज वाशीम यांचे पंकजपाल की प्रबोधनवाणी यातून सप्तखंजीरी कीर्तन होणार आहे. सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी 7 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असणारा अभिजित जाधव व आमु जाधव अंबेजोगाई जि. बीड यांचा लोककलेचा अविष्कार शिवशंभू गर्जना हा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 7 वाजता महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांची ओळख करून देणारा मराठी गीतांचा महाराष्ट्राची ताल यात्रा जयसिंगपूर हा कार्यक्रम होणार आहे. विशेष बाब म्हणजे सेलिब्रेटी म्हणून सुर नवा ध्यास नवा फेम ब्रम्हानंदा पाटणकर मुंबई या उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सकाळी 10 वाजता महिलांची भव्य भगवा फेटा रॅली तर दुपारी 3 वाजता मंगळवेढा शहरातून विविध वांद्यासहित शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.










