टीम लोकमन मंगळवेढा |
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान न मिळालेल्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी गावातील लाभार्थ्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयात ठिय्या मांडला व अनुदान तातडीने देण्याची मागणी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली.
यावेळी नायब तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात 34 लाभार्थ्यांच्या सह्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रा.येताळा भगत, माऊली कोंडूभैरी, गंगाधर मसरे, संतोष माने यांच्यासह शिवसैनिक व अनुदानापासून वंचित असलेल्या महिला लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या जवळपास 550 लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्याचे दरमहा मिळणारे अनुदान मिळत नाही व अनुदान न मिळणाऱ्या लाभार्थ्यांबाबत महसूल खात्याकडून कोणतीही कार्यवाही केली नसल्याने त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही.
शिवाय त्या लाभार्थ्यांकडून केवायसी करण्याच्या नावाखाली आधार कार्ड झेरॉक्स व हयातीची दाखले घेण्यात आले आहेत. तरीदेखील त्यांचे अनुदान जमा झाले नाही. लाभार्थ्यांनी बँकेला हेलपाटे घालून देखील अनुदान जमा नसल्याची खात्री होताच या लाभार्थीनी संजय गांधी निराधार योजनेच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त करताच या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज मंगळवेढा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संबंधित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे. लाभार्थ्याचे अनुदान कोणत्या कारणास्तव बंद झाले. याची माहिती संबंधित लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कळवावी व तात्काळ दुरुस्ती करून त्याचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.









