टीम लोकमन मंगळवेढा |
राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून वाढीव रकमेबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचाच असणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हफ्ता 26 जानेवारीच्या आसपास दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.
या महिन्याच्या हफ्त्यातही लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात 2100 रूपये देण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी यावर नेहमीच टीका केली आहे. जे वचन आम्ही दिले आहे ते पूर्ण करु असे त्या म्हणाल्या आहेत. महिन्याला 3690 कोटींची तरतूद केली आहे. फेब्रुवारीची तरतूदही करतोय. खंड न पडता द्यायचा प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.
“काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुबार योजनांचा लाभ घेतलेले यातून कमी होतील. तक्रारी, तपासणी यातून आकडा कमी होईल. मागील महिन्यांच्या तुलनेत एखादा टक्का कमी होईल. एक दोन लाख संख्या कमी होईल,” असे अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
‘त्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरणार
याआधी अदिती तटकरे यांनी कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र केले जातील असे सांगितले होते.
“तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील, आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.









