टीम लोकमन मोहोळ |
कामगारांची मजुरी देण्यासाठी बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी हातोहात पळविल्याची घटना मोहोळ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बँक ऑफ इंडिया जवळ मंगळवार दिनांक 14 रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे. एवढी मोठी रक्कम हातोहात पळविल्याने मोहोळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ येथील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील कोठारी पाईप या पीव्हीसी पाईप उत्पादक कंपनीचे जगदीश कावळे वय 40 राहणार साठेनगर मोहोळ हे ठेकेदार म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी अडीच वाजता कामगारांच्या पगारी देण्यासाठी जगदीश कावळे यांनी मोहोळ शहरातील बँक ऑफ इंडिया मधील त्यांच्या खात्यावर असलेले अडीच लाख रुपये काढले व ते पैसे एका कॅरीबॅग मध्ये गुंडाळून जवळ असलेल्या पांढऱ्या पिशवीत ठेवले.
ती पैशाची पिशवी कावळे यांनी त्यांचा सोबत असलेला मुलगा भावेश कावळे याच्या हातात दिली. मोटारसायकल चालू केली व मुलाला पाठीमागे बसविले. त्यावेळी ज्याचे पैसे द्यावयाचे होते त्या सुनील कोळेकर याला तुझे पैसे घेऊन जा म्हणून कावळे यांनी फोन केला. त्यावेळी कोळेकर याने कावळे यांना मी कन्या प्रशाले जवळील उड्डाणपुला खाली आहे त्याठिकाणी येण्यास सांगितले. त्या ठिकाणी गेल्यावर पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातला असता आतील रक्कम दिसून आली नाही.
कावळे तातडीने पुन्हा बँक ऑफ इंडियात गेले व घडलेली हकीकत येथील कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोटरसायकल वळवताना दोन महिला त्या ठिकाणी उभ्या असल्याचे दिसल्या त्यापैकी एका महिलेने पिशवीत हात घालून पैसे काढत असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे.
या प्रकरणी जगदीश कावळे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सूळ हे करीत आहेत.









