टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर शहरातील सेवासदन शाळेच्या कंपाऊंडलगत असलेल्या बोळातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले आहे. त्यातील एक सोलापुरातील तर दोघेजण परराज्यातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालत असताना सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला रात्री उशिरा हातात काहीतरी घेऊन जाताना तिघेजण दिसले. संशय आल्याने त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे 5 किलो 370 ग्रॅम गांजा निघाला.
तो विक्री करण्याच्या उद्देशाने तिघेही त्या परिसरात वावरत होते. अविनाश राहुल जाधव (वय 19, राहणार नेहरुनगर, विजापूर रोड, सध्या नॉर्थ गोवा), सुजल सुधीर खरे (वय 19, रा. बुधवार पेठ, मिलिंद नगर, सोलापूर) व अजय आनंद देऊस्कर (वय 24, रा. सालीगाव, नॉर्थ गोवा) या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या तिघेही कोठडीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलिस हवालदार अजय पाडवी, प्रवीण चुंगे, अयाज बागलकोटे, शिवानंद भिमदे, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, सुधाकर माने, अतिश पाटील, अर्जुन गायकवाड, तोसिफ शेख, विनायक जाधव, पंकज घाडगे, सचिनकुमार लवटे व ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली आहे.










