टीम लोकमन सांगोला |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचालकाने मद्य प्राशन करून बस चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सांगोल्याहून जतकडे निघालेल्या बसमध्ये घडली आहे.
प्रकरणी महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळाचे सहायक वाहतूक अधीक्षक पंकज श्रीराम तोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक सुभाष अप्पासाहेब साळुंखे (रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला ते जत ही एसटी बस रविवारी दुपारी दीडच्या सुमारास MH 06 S 8084 जवळा मार्गे जाणारी बस सांगोला बसस्थानकातून मार्गस्थ झाली. दुपारी साडेबारा वाजता सुटणारी सांगोला ते जत बस तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली. बसचालकाने मद्यप्राशन करून सांगोला ते जत जाणारी बस भरधाव चालवण्याचा प्रकार जवळा गावात उघडकीस आल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
…. आणि बसमधील 46 प्रवाशांचे वाचले प्राण
दारूच्या नशेत तर्र असलेल्या बसचालकाने जवळा गावात एका दुचाकीला धडक दिली. यावेळी बसचालक दारूच्या नशेत असल्याचे दिसून येताच प्रवाशांनी जवळा गावातच बस थांबवली. यामुळे बसमधील 46 प्रवाशांचे प्राण वाचले. त्यानंतर महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगोला आगारातून दुसऱ्या चालकास बोलावून घेण्यात आले आणि सांगोला ते जत ही बस मार्गस्थ करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे ‘सुरक्षित सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित सेवेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास अधिक सुरक्षित मानला जात असून त्यामुळे खाजगी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.
परंतु सांगोला जत मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने मद्य प्राशन करून बस चालविल्याने राज्य परिवहन महामंडळाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) व मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.









