टीम लोकमन मंगळवेढा |
विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या पुणे येथील शेकडो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. भोरमधील इंजिनिअरिंग कॉलेजने थकबाकी न भरल्यामुळे बँकेकडून ताबा घेण्यात आला आहे. हॉस्टेलमधील 800 विद्यार्थ्यांना बाहेर काढून न्यायालयाच्या आदेशानुसार कॉलेजचा ताबा घेण्यात आला आहे. या प्रकारामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला असून याबद्दल पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बँक ऑफ बडोदाने 32 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार या महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. कॉलेजची इमारत आणि 14 हेक्टर क्षेत्र बँकेने ताब्यात घेतले आहे.
बँकेने वसतीगृहातील सुमारे 800 विद्यार्थ्यांना बाहेर काढत सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. या कारवाईमुळे डिप्लोमा आणि डिग्री शाखांमधील एकूण 1650 विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे 250 विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग ॲड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या 6 शाखा, डिग्रीच्या 5 शाखा आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकणामुळे पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
17 जानेवारी रोजी इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा होणार? यापुढे शिक्षण बंद होणार का? या विचारामुळे काही विद्यार्थी डोळ्यात अश्रू घेऊन हॉस्टेलच्या बाहेर पडले आहेत. 2009 पासून सुरू असलेल्या या महाविद्यालयात महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार स्वेअर फूटाचे बांधकाम असून कॉप्युटर व इतर साहित्य मिळून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वडवाडी कॅपसमध्ये सध्या जमीन आणि कॉलेजच्या इमारती मिळून सुमारे 132 कोटींची मालमत्ता आहे.










