मंगळवेढा : अभिजीत बने
देशाची भावी तरुण पिढी व्यसनमुक्त व सजग बनावी या उदात्त हेतूने मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत दामाजी चौकामध्ये ‘दारू नको दूध पिऊया’ या व्यसनमुक्तपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या उपक्रमाचे यावर्षीचे हे सातवे वर्ष असून यावेळी 200 लीटर मोफत मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. ‘एक पाऊल व्यसनमुक्त समाजाचे’ हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे निघालेल्या वारी परिवाराने मंगळवेढा तालुक्यात व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक तरूणांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत. देशाची युवा पिढी जेवढी निरोगी व सशक्त आहे तितका तो देश सामर्थ्यवान मानला जातो. परंतु आजचे युवक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असल्याने 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे.
दारू पिऊन गाडी चालविल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच दारूच्या व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम येणाऱ्या भावी पिढीवर होऊ नये तसेच राष्ट्र सामर्थ्यवान बनून युवक ध्येयवादी बनण्यासाठी वारी परिवार व मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दारू पिण्याचे तोटे व दुध पिण्याचे फायदे सांगितले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दामाजी चौकात मसाला दुध पिण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.









