टीम लोकमन मंगळवेढा |
“खेळ तुम्हाला शिकवतात की अपयश म्हणजे शेवट नाही; ही वाढीची सुरुवात आहे.” उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशाला ही वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असलेली मंगळवेढा तालुक्यातील प्रशाला होय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रशालेमध्ये Nova 2k24 या क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक 18 ते 20 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सागर सुभाष लेंगरे, राष्ट्रीय खो खो खेळाडू सुवर्णपदक प्राप्त, रामचंद्र दत्तू उपाध्यक्ष जिल्हा खो-खो असोसिएशन, प्रा. डॉ. संजय शिवशरण इंग्रजी विभाग प्रमुख संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साह पूर्ण वातावरणात दिपप्रज्वलन, ऑलिम्पिक ध्वज फडकवून व मशाल प्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित सर्व अतिथींचा प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व अतिथींनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून जीवनातील खेळाचे महत्व विशद केले.
या क्रीडा महोत्सवामध्ये रनिंग, गोळा फेक, थाळी फेक, बुद्धिबळ, रिले शर्यत, कबड्डी, तीन पायांची शर्यत, बिन बॅलेंसिंग रेस यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पालकांसाठी रस्सीखेच व कॉक रेस यासारखे खेळ ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला व धक्काधक्कीच्या व धावपळीच्या जीवनामध्ये एक विरंगुळा अनुभवला.
संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यामध्ये कबड्डीचा सामना घेण्यात आला. हा कबड्डीचा सामना पाहण्यासाठी प्रशालेचे सर्वेसर्वा, विश्वस्त डॉ. नंदकुमार शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावली व सर्व विद्यार्थ्यांचे मनसोक्त कौतुक केले. या कार्यक्रमासाठी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते संतोष कोळसे पाटील, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या शरदिनी काळे उपस्थित होत्या.
हा क्रीडा महोत्सव पार पाडण्यासाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
अगदी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये व शिस्तबद्ध स्थितीत हा तीन दिवसाचा क्रीडा महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.