टीम लोकमन मंगळवेढा |
सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदारास 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तिने ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास मिरज तालुक्यातील सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या महिला पोलीस हवालदाराने नाव आहे. पोलिसात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र या गुन्ह्यात मदत करण्यासाठी महिला पोलीस हवालदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर यांनी लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी तक्रारीची पडताळणी करून पथकाने काल रात्री सांगलवाडी येथे सापळा रचला. याठिकाणी तक्रारदाराकडून महिला हवालदार मनीषा बडेकर यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल…
महिला पोलीस हवालदार बडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान सदरच्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.









