टीम लोकमन मंगळवेढा |
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 17 हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली होती.
या योजनेच्या 1500 रुपयांमध्ये आता वाढ करुन महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्यात येतील असे आश्वासन राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते.
आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आता 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा लाभ मिळत असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.







