टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. पण तरीही राज्यभरातील पोलिसांच्या कारवाईमध्ये कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये आज साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुलेश्वरमधून 2.3 कोटींची रोकड तर शिवडीतून एक कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. याशिवाय जालन्यामधून 52 लाख तर जळगावातून 25 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईत झाली मोठी कारवाई…
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. भुलेश्वर परिसरातून 2.3 कोटींची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पैशासह 12 संशयीतांनाही ताब्यात घेतले आहे. शिवडीमध्ये एका कॅबमधून 1.10 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.
जालन्यात 52 लाख 89 हजारांची रोकड जप्त
जालना शहरातील किरण पेट्रोल पंप परिसरात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 52 लाख 89 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जालना शहरातील बसस्टँड रोडवरील किरण पेट्रोल पंप येथे नाकाबंदी दरम्यान व्हॅगन आर कार क्र. MH21BV0463 ची तपासणी करत असताना कारमध्ये 52 लाख 89 हजारांची रक्कम गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आली. अभिजीत मोहन सावजी वय 24 वर्षे राहणार संभाजीनगर जालना असे वाहन चालकाचे नाव असून सदर संशयित व्यक्तीकडे नियमापेक्षा जास्तीची रक्कम निवडणुकीच्या काळात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील चालकाने या रकमेचा तपशील न दिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सदर रक्कम जप्त करुन पुढील कार्यवाहीसाठी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
जळगावात बड्या राजकीय नेत्याची 25 लाखांची रोकड जप्त
जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद हिरामण पवार असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 व 100 च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
सोलापूरमध्ये 20 लाखांची रोकड जप्त…
निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून 12 कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 बनावट पिस्तूल आणि 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांची विशेष मोहीम सुरु आहे. त्याअंतर्गत या कारवाया करण्यात येत आहेत.










