टीम लोकमन सोलापूर |
नुकतेच पार पडलेल्या जागतीक सियाना इंटरनॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत महेंद्र बाकळे यांना सियाना इंटरनॅशनल ॲवार्ड व ड्रोन फोटो ॲवार्ड हे जागतीक पातळीवर मानाचे समजले जाणारे दोन पुरस्कार सियाना इटली येथे एका शानदार कार्यक्रमात नुकतेच प्रदान करण्यात आले.
सोलापूर येथील मॉडर्न प्रिंटिंग प्रेसचे महेंद्र बाकळे यांच्या छायाचित्रांचा समावेश लंडन येथे होत असलेल्या ‘द इंडिपेंडेंट फोटोग्राफी प्रदर्शनात’ करण्यात आला आहे. हे प्रदर्शन 17 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान लंडन येथील 4 लिओनार्ड सर्कस येथे होणार आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 33 छायाचित्रकारांची निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आली आहेत.
मॅग्नम फोटोज, नॅशनल जिओग्राफिक, ए.ए.पी. (ऑल अबाऊट) फोटो ॲवार्डस, स्ट्रीट फोटो ॲवार्ड, लँडस्केप, पोट्रेट, डॉक्युमेंटरी या सारखे काही निवडक फोटो या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातून फोटो प्रेमी येत असतात. सोलापूरच्या हौशी फोटोग्राफरला मिळालेला हा सन्मान सोलापूरचे आणि देशाचे नाव उंचवणारा आहे. याबद्दल महेंद्र बाकळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इंडिपेंडेंट फोटोग्राफर एक्झिबिशन मध्ये ही छायाचित्रे समाविष्ट झाल्याने स्वप्न पूर्ण झाल्याचे महेंद्र बाकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व्हीआयपी रोड आणि अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे स्वतःचे अद्ययावत प्रिंटिंग युनिट असलेले महेंद्र बाकळे म्हणाले की, फोटोग्राफीचा छंद खूप वर्षांपासून असला तरी त्याला खरी चालना 2015 नंतर मिळाली. 2001 मध्ये कॅनन पावर शॉट अे 20 हा दोन मेगापिक्सलचा कॅमेरा 18 हजार रुपयात घेतला आणि आजही तो कार्यरत आहे. त्यानंतर 2015 मध्ये कॅननचा एस.एल.आर. कॅमेरा एक लाख रुपयात घेतला. भ्रमंती वाढल्यानंतर 2019 मध्ये सोनी कंपनीच्या अे 7 आर 4 हा 61 मेगापिक्सलचा कॅमेरा लेन्ससहित 12 लाख रुपयांना खरेदी केला.
आजतागायत 30 आंतरराष्ट्रीय आणि 20 देशांतर्गत पुरस्कार मिळाल्याचे सांगून बाकळे म्हणाले की, गेल्या महिन्यात इटली येथे सियाना इंटरनॅशनल अवॉर्ड तसेच ड्रोन फोटो अवॉर्ड मिळाले. इटली देशातील सियाना या अतिसुंदर शहरामध्ये तब्बल पाच दिवस जागतिक दर्जाच्या 80 छायाचित्रकार आणि आर्टिस्ट समवेत सानिध्यात राहून त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळवले.
आता ओळख निर्माण झाली याचा अभिमान
फोटोग्राफी मध्ये आता ओळख निर्माण झाली आहे. एखादा फोटोग्राफर जागतिक पातळीवर पाहिला तर ती व्यक्ती चटकन म्हणते, अरे हे तर भारतातील महेंद्र यांने काढलेले छायाचित्र. अर्थात ही ओळख तयार करण्यासाठी काही दशके सातत्याने काम करावे लागले. छायाचित्र कला अवगत करण्यासाठी प्रचंड सहनशीलता (पेशन्स) लागतात असे सांगून महेंद्र म्हणाले की, थायलंडमध्ये एक छायाचित्र काढण्यासाठी मी तब्बल चार दिवस सूर्यास्ताच्या वेळी सातत्याने जात होतो. अखेर चौथ्या दिवशी छायाचित्र काढण्यात मला यश मिळाले.

याउलट सोलापुरात एक छायाचित्र पहिल्याच प्रयत्नात अतिशय कमी वेळेत मिळाले होते. या चित्रात होम मैदानाजवळील रोडवरील भिंतीवर रंगविलेली नर्तिका, समोर कट्ट्यावर बसलेला तंबाखू चोळणारा व्यक्ती आणि त्याच्याशी संवाद साधणारा भगव्या कपड्यातील व्यक्ती या तिघांच्याही हस्तमुद्रा (हाताची बोटे) एकाच प्रकारच्या आहेत.
दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये म्हणजे व्हिएतनाम, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, जपान आणि भारत या ठिकाणी सातत्याने भ्रमंती चालू असते. येथील पारंपारिक वातावरण आणि शतकानूशतकांची परंपरा जपणारे आदिवासी, मच्छीमार, शेतकरी यांची छायाचित्रे टिपण्यात खरोखरच आनंद मिळतो असेही बाकळे यांनी स्पष्ट केले.
बर्मा म्यानमार येथे काढलेली छायाचित्रे मुंबईतील म्यानमारच्या दूतावासात लावण्यात आली आहेत. फोटोग्राफीचा छंद जोपासत असतानाच वॉर्डनबर्ग सिंड्रोम झालेल्या परंतु अजूनही दिव्यांग या प्रकारात मोडत नसलेल्या व्यक्तींची छायाचित्रे काढल्याचे व त्यावर थोडासा अभ्यासही केल्याचे बाकळे यांनी स्पष्ट केले. या व्यक्तींची छायाचित्रे काढण्यासाठी पश्चिम सुमात्रा, जकार्ता, व्हिएतनाम, इंडोनेशियातील मंतावाय बेट अशा ठिकाणी भ्रमंती केली व एकेका छायाचित्रासाठी आठ-आठ दिवस संबंधित व्यक्तीच्या पालकांचे कौन्सिलिंगही केले असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पॅरिस इंडिपेंडेंट फोटोग्राफी इंटरनॅशनल अवॉर्ड, मोनोक्रम फोटोग्राफी अवॉर्ड, पोलंड येथील ऑनरेबल मेंशन, एनडी फोटोग्राफी अवॉर्ड, इंडिगो एरलायन्स ट्रॅव्हल पार्टनर आदी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याचा महेंद्र बाकळे यांनी उल्लेख केला.
ब्रँड अँबेसेडर
या शिवाय अत्यंत मानाचे समजले जाणारे सॅमसंग मोबाईल ब्रँड अँबेसेडर, सिग्मा रीजनल अँबेसेडर पद, सोनी अल्फा यूजर, सिग्मा लेन्स ब्रँड अँबेसेडर फॉर इंडिया म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. त्यांचा मोठा मुलगा आर्यन सध्या Emobility & Drone टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक करीत आहे. वारसा तो निश्चितपणे चालवेल असा विश्वासही महेंद्र बाकळे यांनी व्यक्त केला.








