टीम लोकमन मंगळवेढा |
पुरोगामी महाराष्ट्रातील शैक्षणिक परंपरेला आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून चंद्रपूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंगीच्या गोळ्या देऊन या विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सदर शिक्षका विरुद्ध कोपरना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. आरोपी शिक्षक काँग्रेसचा पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 11 वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. यासंबंधीची तक्रार पीडीत विद्यार्थिनीने कोरपना पोलिसात केली असून सदर शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. ही घटना मे महिन्यातील असून याची तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली आहे.
पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला येत होते. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा उन्हाळी वर्ग घ्यायचा. एक दिवस त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेली गोष्ट घरी सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली.
पण पीडित मुलीने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता. या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यावर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी शिक्षका विरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता. मात्र आज पहाटे त्याला अकोला येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक हा कोरपना येथील युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.








