टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सध्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जोरात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत.
भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पावर गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी चाचपणी सुरु झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजू शकते. याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सवापूर्वीच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार?
विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. आता या सगळ्या धामधुमीत येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरु करता येईल का? याचीही चाचपणी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, नवीन सरकारची स्थापना ही 10 ऑक्टोबर 2024 पूर्वी करता येईल का, याची सुद्धा चाचपणी केली जात आहे.
राजकीय समीकरणांची जुळवाजुळव झाली सुरु?
महायुतीच्या नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल सुरु असलेल्या घडामोडींची माहिती मिळताच राज्यातील अनेक मंत्र्यांनी आपआपले मतदारसंघ गाठले आहेत. अनेक आमदार हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर काही मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे.










