टीम लोकमन मंगळवेढा |
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 3 मजली रहिवासी इमारत कोसळली असून, त्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून बचाव कार्याला सुरूवात केली आहे.
दरम्यान ही दुर्घटना घडण्याआधी काही लोकांनी इमारती मधील रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे.
दरम्यान ही दुर्घटना सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात घडली आहे. या 3 मजली रहिवासी इमारतीत तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारत हलत असल्याचे जाणवल्यानंतर त्याने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर परिसरातील नागरिक तेथे गोळा झाले आणि त्यांनी इमारतीतील सर्व मजल्यांवरील रहिवाशांना तातडीने बाहेर काढले.
शहाबाज गावात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की, पहाटे पाचच्या सुमारास इमारत कोसळली. ही G+3 इमारत आहे. हे गाव बेलापूर प्रभागांतर्गत येते. इमारतीत 13 फ्लॅट होते. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून दोन जण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. बचावकार्य सुरू आहे. बचावलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कैलास शिंदे यांनी पुढे सांगितले की, ही 10 वर्षे जुनी इमारत असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितले. तपास चालू आहे. चौकशीअंती इमारतीच्या मालकावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.







