टीम लोकमन मंगळवेढा |
विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये प्रवेश केलेले आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे माजी आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे. भालके हे महविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते.
अभिजीत पाटलांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला
भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. महविकास आघाडीकडून भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके यांनी प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या उमेदवर प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचे आपण पाहिले आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भालके हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालकेंचा झाला होता निसटता पराभव
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनी संधी देण्यात आली होती. तर भाजपने उद्योजक समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, या निवडणुकीत जनतेने भगीरथ भालकेंना नाकारत समाधान आवताडेंच्या बाजूने कौल देत त्यांना विजयी केले होते.
त्यानंतर पक्षनेतृत्वावर नाराज झालेल्या आणि काही काळ पक्षापासून अलिप्त झालेल्या भगीरथ भालके यांनी वेगळा मार्ग धरत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. आणि मोठा गाजावाजा करत त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते.
येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. भगीरथ भालके हे देखील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तशी मोर्चेबांधणी देखील त्यांनी सरु केली आहे. मतदार संघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि दौरे वाढवले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.










