टीम लोकमन सोलापूर |
रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 30 जून रोजी संपन्न होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट रोटे. माऊली झांबरे यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे 2024-25 साठीचे प्रेसिडेंट म्हणून रोटे. डॉ. अमित गायकवाड-पाटील तर सेक्रेटरी म्हणून रोटे. अक्षय पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह शिंदे चौक सोलापूर येथे होणार आहे.
या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2025-26 चे नॉमिनेटेड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. सुधीर लातुरे हे उपस्थित राहणार आहेत. तर रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे 2024-25 चे सहाय्यक प्रांतपाल रोटे. बबनराव शेंडगे यांचे प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे 2023-24 चे प्रेसिडेंट म्हणून रोटे. माऊली झांबरे व सेक्रेटरी म्हणून रोटे. विक्रम बंडेवार यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. 2023-24 या वर्षात रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरने पर्यावरणाच्या समतोलासाठी भरीव कार्य केले असून वृक्ष लागवड आणि संवर्धन या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. त्यांनी श्रावण महिन्यात महिलांसाठी घेतलेल्या सरींवर सरी या उपक्रमाचे सर्वत्र मोठे कौतुक झाले होते. या उपक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन रोटे. डॉ. नयना व्यवहारे यांनी या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते.
रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे 2024-25 चे प्रेसिडेंट म्हणून रोटे. डॉ. अमित गायकवाड-पाटील यांची निवड करण्यात आली असून डॉ. गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी मध्ये कार्यरत आहेत. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या सर्व सदस्यांनी त्यांची क्लबचे प्रेसिडेंट म्हणून बिनविरोध निवड केली आहे. डॉ. गायकवाड हे डेंटिस्ट असून अनेक वर्षांपासून ते सोलापूर येथे रुग्णसेवा करीत आहेत. त्यांनी हजारो रुग्णांना वेदनेच्या प्रवासात मदतीचा हात दिला आहे. त्यामुळेच एक नामवंत दंतरोग तज्ञ म्हणून अल्पावधीतच त्यांची सोलापूर व परिसरात ओळख निर्माण झाली आहे.
रविवार दिनांक 30 जून रोजी शिवस्मारक सभागृह शिंदे चौक सोलापूर येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या पदग्रहण समारंभासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील रोटेरियन्स आणि रोटरीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट रोटे. माऊली झांबरे व सेक्रेटरी रोटे. विक्रम बंडेवार यांनी केले आहे.











