नांदेड : उज्वला गुरसुडकर
कान्हूर पठार येथील नाभिक समाजाचे सलून व्यवसायिक विनायक कुटे यांचा मुलगा निखिल यास मिझोराम येथील एनआयटी या संस्थेत भौतिकशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची २५ लाख रुपयाची फेलोशिप मंजूर झाली आहे. निखिलच्या या नेत्रदीपक यशामुळे त्याच्या आई वडिलांना आकाश ठेंगणे वाटू लगले आहे.
निखिलने आपले पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण कान्हूर पठार येथील जनता विद्यालयात घेतले आहे. त्यानंतर वडिलांना हातभार लावण्यासाठी त्याने काही दिवस त्यांचाच पारंपरिक व्यवसाय असलेल्या सलूनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सलूनमध्ये काम करताकरता त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण केले. पुढे त्याने भौतिकशास्त्र याच विषयात एमएससी पूर्ण केली आणि पुणे येथील महाविद्यालयात प्राध्यापक पदावर काम सुरू केले.
निखिलला अकरावी पासूनच आवड होती. त्याने तेंव्हाच ठरवले होते की भौतिकशास्त्र याच विषयात करियर करायचे. मध्यंतरी कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान घरी असताना त्याने एका दुर्बिणीची निर्मिती देखील केली होती. या दुर्बिणीच्या क्षमता मंगळ आणि चंद्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी होती. निखिलने आजवर भरपूर राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकल्या आहेत. भविष्यात इस्त्रो आणि नासा सारख्या रिसर्च फिल्डमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे.
निखिलच्या याच कौशल्याची दखल मिझोरामच्या एनआयटी या संस्थेने घेतली आणि देशभरातील तब्बल ४५०० विद्यार्थ्यांमधून त्याची निवड पीएचडी साठी करण्यात आली आहे. ही निवड भौतिक साहित्यिक विज्ञान या विषयात डॉक्टरेट या पदवीसाठी कण्यात आली आहे. यावेळी केवळ तीनच विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातही निखलने दुसरा क्रमांक पटकवला आहे. निखिल महाराष्ट्रातून पहिला तर देशातून दुसरा आला आहे. याकरिता त्याला केंद्र सरकारकडून २५ लाख रुपयाची फेलोशिप देखील तात्काळ मंजूर करण्यात आली आहे.
यासाठी त्याला त्याचे आई, वडील, प्राध्यापक कदम, खराडे, शेरकर, आहेर, ढवळे, रेपाळे, परजणे, कोरडे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
निखिलच्या याच दैदिप्यमान कामगिरीची दखल घेत नगरचे खासदार नीलेश लंके यांनी त्याचा विशेष सन्मान केला आहे.नाभिक समाजातील विविध संघटना,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून देखील निखिलचे रोज अभिनंदन होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







