टीम लोकमन मंगळवेढा |
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस पडत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल मंदावली होती. आता तो पुन्हा सक्रिय झाला असून उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
पुढील ४ दिवस दक्षिण कोकणासह राज्यील अन्य भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज जारी करण्यात आलाय. तसेच सातारा, कोल्हापूर आणि पुण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पेरणीच्या कामाला गती मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात उद्यापासून वाढणार पावसाचा जोर
नैऋत्य मोसमी वारे पुण्यात दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पहायला मिळाले होते. सोमवारपासून (ता. 24) शहर व जिल्ह्यात मान्सून सक्रिय होणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. किमान पुढील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
पावसाने शेतकरी सुखावला
दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस झाला. तसेच ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. आकुर्डी परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दुपारपासूनच शहरातील विविध भागात पाऊस पडत होता.









