टीम लोकमन मंगळवेढा |
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 400 पारचा नारा दिला होता. परंतु एनडीएला 300 चा आकडा सुद्धा पार करता आला नाही. भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही.
भाजपला सर्वाधिक फटका महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बसला. महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर राज्यातील भाजप नेत्यांनी विचारमंथन सुरु केले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रणनीती तयार केली जात आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्टमोडवर आला आहे. संघाकडून यासाठी मेगा प्लॅन तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काय आहे संघाची रणनीती?
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदाराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
संघाकडून भाजप नेत्यांना खडेबोल
लोकसभा निवडणूक निकालानंतर संघाकडून भाजपला सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावले जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय काढला. त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेतल्यासंदर्भात संघाकडून प्रश्न उपस्थित झाला. तसेच अंहकारी पक्षाला 241 जागांवरच रोखले, असे वक्तव्य संघाकडून झाले होते. त्यासंदर्भात विरोधकही आता भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची कार्यशाळा संघाकडून घेण्यात येणार आहे.
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची चर्चा आहे. हा विस्तार करताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच करण्यात येणार आहे. भाजपमधून संधी देताना संघाचा सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. आता शेवटच्या टप्प्यात तरी मंत्रिपद मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक इच्छुक आमदार यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.











