टीम लोकमन कोल्हापूर |
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. दरम्यान, ओमप्रकाश दिवटे यांची येथून बदली झाली असून ते ‘मॅट’मध्ये आव्हान देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेची स्थापना दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात झाली. सुधाकर देशमुख यांनी दोन वर्ष प्रशासक म्हणून काम पाहिले. त्यानंतर दिवटे हे गेले वर्षभर या पदावर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असताना मुदतपूर्व बदली झाली आहे.
या पदावर आता सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पाटण गावच्या सुकन्या असलेल्या पाटील यांना १३ वर्षाचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. त्यांच्या सेवेची सुरुवात धुळे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावरून झाली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत त्यांनी उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. महाबळेश्वर शहराचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले होते.
पल्लवी पाटील यांनी सहा वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. शांत संयमी स्वभावाच्या असलेल्या पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन मंगळवेढ्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. त्यांनी मंगळवेढा नगरपालिका प्रशासनाला एक चांगली शिस्त लावली होती. कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये उत्तम समन्वय ठेवून त्यांनी शहराच्या विकासाचा रथ हाकला होता. मंगळवेढा नगरपालिकेत कार्यरत असताना एक आदर्श महिला अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.










