टीम लोकमन सोलापूर |
जिल्ह्यात पावसाळयात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.त्यामुळे पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुध्दीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. ग्रामीण भागात पाण्याचे नियमित शुध्दीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणी पुरवठा होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दक्षता घ्यावी. असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना देण्यात आलेल्या लेखी सुचनामध्ये सांगितले आहे की, जिल्ह्यात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये पावसाचे पाणी मिसळल्याने साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता असते. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही साथीचा उद्रेक होऊ नये याबाबत आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे व त्यासाठी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जेणेकरुन जलजन्य व किटकजन्य साथरोगांच्या उद्रेकास निश्चितच आळा बसू शकेल.
जिल्ह्यातील सर्व गावात योग्य पध्दतीने नियमित शुध्दीकरण प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करणे, जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी पुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवणे, सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दुषित पाणी नमुन्याबाबतचा आढावा घेणे आवश्यक आहे. आणि याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर करून पाणी गुणवत्ता सनियंत्रणातील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित केलेल्या प्रपत्रातील माहिती उपलब्ध करणे आवश्यक आहे.
सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही याची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करणे, डास व माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता विषयक उपाययोजना करणे, पाणी शुध्दीकरणासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर, सोडीअम हायपोक्लोराईड, तुरटी यांचा पुरेसा (तीन महिने पुरेल एवढा) साठा उपलब्ध करण्यात यावा. ज्याठिकाणी ब्लिचिंग पावडरचा साठा नाही अथवा कमी आहे, तेथे ब्लिचिंग पावडरचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा. सुरक्षित पाणी मिळविण्यात येणाऱ्या अडचणींबरोबर दूषित पाणीपुरवठा, दूषित जलस्त्रोत, जुनाट आणि गंजलेले नळ पाईप लाईन व गटारीखालून जाणाऱ्या जलवाहिन्या यामुळेही अनेकदा गॅस्ट्रो, काविळ, कॉलरा, अतिसार, विषमज्वर इत्यादी जलजन्य आजारांचा उद्रेक होत असतो.
यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन्सची तपासणी करुन, त्यांना गळत्या असल्यास त्या काढणे व त्या पाईपलाईन्स गटारातून अथवा गलिच्छ पाण्यातून जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता दर तीन महिन्यातून एक वेळा करावी. तसेच दुषित पाणी पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात यावी. असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले आहे.
नागरिकांना निर्जंतुक व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या ग्रामपंचायतीच्या मुलभूत कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या गावांना जोखीमग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात यावे तसेच जोखीमग्रस्त गावांची यादी जिल्हा स्तरावर देण्यात यावी.
सुनिल कटकधोंड कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
जलजन्य व किटकजन्य रोगांच्या उद्रेकांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करुन जनतेस शुध्द व निर्जंतुक पाणीपुरवठा ही महत्वपूर्ण आणि जीवनावश्यक सामाजिक सेवा वेळेवर उपलब्ध करुन दयावी व या कामामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क आणि जागरुक राहून उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्यात यावा.
अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )










