टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणूक संपताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. त्यातच गजानन किर्तीकरांच्या विधानांवरून नाराज शिशिर शिंदे यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन किर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
त्यावर त्या मागणीवरून आता शिंदे गटात राजकारण चांगलेच तापले आहे. गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर आम्हीही विचार करू. आम्हीही शिवसैनिक, चुकीच्या गोष्टी आम्ही सहन करत नाही असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला असून किर्तीकरांच्या समर्थनार्थ आनंदराव अडसूळ पुढे आले आहेत.
आनंदराव अडसूळ म्हणाले की, गजानन किर्तीकरांवर जो आरोप होतोय, त्यांनी मुलाला मदत केली. क्षणभर आपण समजलं मदत केली असेल, ते दोघे पिता-पुत्र एकाच घरात राहतायेत. आपण मुलाला जन्म दिलाय, वारसा हक्काने त्याला सगळं द्यायचा प्रयत्न करतो. जरी तात्विक वाद असले तरी मुलाला मदत केली पाहिजे असे वाटणे काहीच चुकीचे नाही. मदत केली की नाही हे सांगता येत नाही. पण ते चुकीचे आहे हेदेखील वाटत नाही असे त्यांनी सांगितले.
तसेच चळवळीत काम करणारी व्यक्ती दगा देईल हे मी तरी कदापी मान्य करणार नाही. फॉर्म भरायचा आणि त्यानंतर मागे घेणार अशी भावना तुम्ही एखाद्यावर लादणार असाल तर ते बरोबर नाही. किर्तीकर बोलले, मुलगा असून मला त्याचा प्रचार करता आला नाही. ही खंत वाटणे गुन्हा आहे का?. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. शिशिर शिंदे आहे कोण?, गजानन किर्तीकरांनी चळवळीतून काम केले आहे. शिशिर शिंदे हे कोण आहेत त्यांनी किर्तीकरांवर कारवाई करावी म्हणावं, आधी मनसे, शिवसेना आणि त्यानंतर या शिवसेनेत आलाय त्याला अधिकार काय? असा घणाघातही आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदेवर केला.
दरम्यान, संपूर्ण राज्यातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल हे आपल्याला स्वीकारावं लागेल. विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत. या एकजुटीचा थोडाफार फटका महायुतीला बसेल असं विधानही अडसूळ यांनी केले.









